top of page

मनोगत 

मेळघाटातली सर्जिकल एक्स्प्रेस....
Below article is by Dr Maya Bhalerao from Pune who participated in camp Sept 2025 at MAHAN Melghat.

आमची कार खडबडीत रस्त्यावर धावत होती. प्रत्येक धक्क्याबरोबर शहराचा गोंगाट मागे पडत होता आणि आम्ही मेळघाटच्या दिशेने चाललो होतो. जिथे ‘शहरीकरण’ आणि ‘विकसित भारत’ या शब्दांचा आवाजही पोहोचत नाही—तोच हा भाग !!

मेळघाट म्हणजे एकेकाळी  उपासमारीची- कुपोषणाची वेदना, अंधश्रद्धेची घट्ट पकड आणि निसर्गाच्या कुशीत जगणाऱ्या माणसांची करूण  कहाणी.

अन्न, वस्त्र, निवारा—या साध्या गरजांचंही गणित जुळत नाही इथे. चैनीच्या, सुखसोयीच्या गोष्टी तर दूरच. पण निसर्गाने मात्र कधीही कमी केलं नाही. सातपुडा पर्वतरांगांत दडलेलं हिरवं घनदाट जंगल, खोल दऱ्या,  खळखळणारे धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट, वाघ-बिबट्यांच्या पाऊल खुणा … एवढं अप्रतिम सौंदर्य लाभूनही मेळघाटवासीयांचं जीवन दुःखांनी व्यापलेलं होतं.

इथे आजार म्हणजे 'देवाचा कोप' किंवा 'भगवान की देन', औषधोपचार हा त्यांच्या जगातला शब्दच नाही. झाडपाला, झाडाच्या साली, बुवाबाजी—याच त्यांच्या औषधपद्धती. अज्ञान, निरक्षरता आणि दारिद्र्य यांनी त्यांना घट्ट वेढलं होतं.

पण देव जगाचा समतोल राखतो म्हणतात, ते खरं असावं.

मेळघाट साठी देवानेच दोन देवदूत पाठवले—डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव.

२७ वर्षांपूर्वी एका छोट्या झोपडीत त्यांनी उपचार सुरू केले. आज ती झोपडी एका नावारूपाला आलेल्या मंदिरासारख्या रुग्णालयाच्या रूपात—“महान चॅरिटेबल हॉस्पिटल फॉर ट्रायबल पिपल" दिमाखात उभी आहे.

शहरात राहून पैसा, सुखसोयी, नाव–प्रतिष्ठा मिळवणं त्यांना शक्य होतं. पण त्यांनी वेगळी वाट निवडली—अडचणींची, त्यागाची, कष्टांची आणि म्हणूनच ते खरे अर्थाने विलक्षण ठरतात ! 

आदिवासींना डॉक्टरांवर विश्वास नव्हता. पण सातव दांपत्याने आपल्या कार्याने आजपर्यंत हजारो रुग्णांना बरे केलं. हळूहळू विश्वासाची छोटी ठिणगी पेटली आणि आता मेळघाटात रुग्ण गंभीर आजार झाल्यास स्वतःहून हॉस्पिटलमध्ये येतात.

त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलच्या प्रांगणात पोहोचलो. बाया- बापड़े हातात बोचकी-बाचकी, डोळ्यांत अपार आशा घेवून जमा झाले होते.
त्यांच्या डोळ्यांतली कातरता, असाह्यता मला अस्वस्थ करून गेली.

कॅम्प घेणं म्हणजे खूप मोठी तयारी ! आठवडाभर आरोग्यदूत, आशा वर्कर्स गावोगावी फिरून लोकांना समजावतात. कविता सुद्धा फिल्ड वर्क करते. ऑपरेशन का करावं लागतं? त्याचे फायदे काय? हे काळजीपूर्वक पटवून सांगतात. एकदा का ते राजी झाले की मग तपासण्या करण्यात येतात. रजिस्ट्रेशन, संमतीपत्र pre op fitness—हे सगळं झालं की पुढे ऑपरेशनची पायरी.

ऑपरेशन थिएटर म्हणजे जणू युद्धभूमी. इन्स्ट्रुमेंट्स, गाऊन्स, इंजेक्शन, सलाईन—सगळ्याचा काटेकोरपणे बंदोबस्त. हा सर्व जामानिमा तयार करता करता दमछाक होते. प्रत्येक रुग्णाला अँटीबायोटिक्स, सलाईन देऊन तयार केलं जातं. माईकवर सतत नावं पुकारली जातात आणि एका मागून एक रुग्ण आत जातो.

मी भूलतज्ञ म्हणून सज्ज होते. माझं काम होतं रुग्णांना वेदनामुक्त ठेवणं, सुरक्षित भूल देणं. पण मन मात्र सतत भरून येत होतं—हे लोक इतके त्रास असूनही किती शांत, किती सोशिक !

डॉ. सुधीर भालेराव,
डॉ. विनीत कोल्हे, डॉ. अजय देशपांडे,  डॉ. ज्ञानेश्वर 
गोडे, डॉ सातव कपल —आम्ही चार टेबलांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया सुरू केल्या.

हर्निया, गर्भाशयाचे आजार- गाठी , पाइल्स, फिस्टुला, डोळ्यांतून वाहणारं पाणी ( Endonasal DCR) ..अनेक आव्हानात्मक केसेस होत्या . एकामागोमाग एक रुग्ण सर्जरी करून वार्ड मध्ये शिफ्ट केल्या जात होते. या क्षणी जाणवलं—इथे टीम स्पिरीट किती महत्वाचे आहे, नाही ? भूलतज्ञ, सर्जन, ओटी स्टाफ—वार्ड सिस्टर्स सगळ्यांचा समन्वय साधून काम केल्यास खूप आनंद होतो. आमची 'सर्जिकल एक्स्प्रेस" जोरात धावत होती. दीड दिवसात आम्ही 50 सर्जरी यशस्वी रित्या पार पाडल्या. 

या सर्वांचा उर्जास्त्रोत म्हणजेच आशिष आणि कविता.डॉ. आशिष—उत्तम फिजिशियन. कोविडच्या काळात मेळघाटात एकट्याने लढा देऊन शेकडो जीव वाचवले. 

“मॅडम, तुम्ही भूल द्या, मी पोस्ट-ऑप बघतो”—त्यांच्या या एका वाक्यात मला हाय रिस्क पेशेंट्सला भूल देण्याचे धैर्य मिळतं.
डॉ. कविता—नेत्रतज्ञ. हजारो डोळ्यांना तिनं नेत्र सुख दिले. असंख्य मोतिबींदू ऑपरेशन्स ने नवा विश्वास दिला. 

या जोडप्याचा उत्साह अफाट आहे. त्यांना साथ देणारी टीम—समीर पळस्कर, अविनाश–शिल्पा सातव आणि इतर सगळे—हे देखील त्यांच्याइतकंच निस्वार्थीपणे काम करतात. बाहेरून आलेल्या डॉक्टरांची जी आस्था आणि काळजी घेतली जाते, ती हृदयाला भिडते. माझे batchmates चा  उल्लेख मला करावासा वाटतो.. डॉ संजय देवतळे, डॉ अभिजीत भारद्वाज, डॉ प्रशांत गहूकर यांचे योगदान मोलाचे आहे. 

मला असे वाटते आम्ही रोज सेवा देवू शकत नाही, रोज जावू शकत नाही, पण निदान एकदा तरी महान हॉस्पिटलला कॅम्पच्या निमित्ताने भेट दिली आणि आप आपल्या परीने हातभार लावला तरी आनंद- समाधान काही औरच ! या  देवाणघेवाणामध्ये एकमेकांना प्रोत्साहन- ऊर्जा नक्कीच मिळते.

डॉ सातव यांनी आज महान हॉस्पिटलमुळे मेळघाटात आरोग्याचा आलेख ऊंच नेला आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम आणि या माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी केलेला सन्मान, Lancet मधील संशोधन—हे सारे त्यांच्या कार्याचीच साक्ष आहेत.

मेळघाटाच्या अंधारात आशेचा दिवा पेटवणाऱ्या या सेवेला माझा शतशः सलाम !!

डॉ माया भालेराव
Pune. 
25.9.25.

Saturday, 4 January 2020

                                                सर्जिकल महामेळा@मेळघाट डॉ माया भालेराव, पुणे 

Below article is by Dr Maya Bhalerao from Pune who participated in Plastic surgery camp December 2019 at MAHAN Melghat.

 
         सकाळी साडे सहा वाजता ट्रेनने बुऱ्हानपूर गाठले. घ्यायला आलेल्या गाडीत सामान टाकले आणि मेळघाटाच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
         नुकतेच झुंजूमुंजू झाले होते. दूरदूर पर्यंत माणूस, घरे काहीकाही दिसत नव्हते. आजूबाजूचा निसर्ग, ते आल्हाददायक वातावरण, तो जंगलाचा मंद दरवळणारा एक सुगंध, मध्येच आजूबाजूला दिसणारा हिरवागार परिसर मनभावन होता. माणसांच्या गर्दीतून आणि कॉन्क्रीटच्या जंगलातून बाहेर पडून इथे रमणीय निसर्गाच्या कुशीत अलगद शिरतांना खूप मस्त वाटत होते.

मेळघाटातला आजचा सुर्यादय नवीन उभारी- नवीन उर्जा देत होता. मी भरभरून घेत होते. बघता बघता कधी इच्छित स्थळी - महान चॅरिटेबल ट्रस्ट फॉर ट्रायबल पिपल ला येवून पोहोचले कळलेच नाही.

    मेळघाट म्हणजे महाराष्ट्रातील जंगलांनी आच्छादलेला, डोंगरदऱ्यानी वेढलेला, वेड्यावाकड्या पळणाऱ्या सिपना नदीने घेराव केलेला, डोक्यावर आकाशाचे छत आणि पायाखाली धरतीची जमीन असलेला, पोटभर अन्न आणि अंगभर कपडे यांच्या पासून वंचित असलेला, सर्वात जास्त माता बाल मृत्यू आणि कुपोषित आदिवासी असलेला दुर्गम भाग !

      ताटात आलेल्या पंचपक्वानाचा घास आणि वाट्याला आलेले स्थिर आयुष्य बाजूला सारून मेळघाटाच्या जंगलात स्थायिक होण्याचं धैर्य- त्याग याची तुलना कश्याशीही करू शकत नाही. त्यांच्या या महान कृत्याला लांबूनच फक्त ‘सलाम’ ‘HATS OFF’ म्हणण्यात मला तारतम्य वाटले नाही. काहीतरी योगदान दिलेच पाहिजे म्हणून दरवर्षी मेळघाटाच्या वारीचा मनसुबा केला.

        ही मंडळी आरोग्याच्या सेवेपासून, त्याबद्दल असणाऱ्या जागृतीपासून कोसभर दूर आहेत. स्वच्छता- माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाट्याला कधी येईल कोण जाणे ?

शिक्षणाचा अभाव असल्याने प्रचंड अज्ञान आणि अंध:श्रद्धा आहेत. त्यांना काही आजार झालायं, गाठ आहे- ती कॅन्सरची आहे की, साधी आहे, त्यावर इलाज होऊ शकतो, ऑपरेशन करून व्यंग काढू शकतो हे समजण्या इतपत त्यांची क्षमता नाही आणि आर्थिक कुवत तर नाहीच नाही.

तान्ह्या बाळाला PHIMOSIS साठी लघवीच्या जागी अनेक चटके देऊन बरे होईल हे त्यांचे मानसशास्त्र !

        फ्रेश होऊन नास्ता करून OPD चा रस्ता पकडला. एकाच आवारात आहे हे सगळं. हॉस्पिटल मध्ये कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागावी म्हणून लाल,पिवळ्या, निळ्या डस्टबीनने लक्ष वेधून घेतले. डॉआशिष- डॉ कविताची तळमळ प्रत्येक कोपऱ्यात दिसून येत होती. आवारात लावलेले सूचना फलक शिस्तबद्ध कामाची पद्धत दर्शवित होते.

रुग्णाची कॉम्पुटर लिस्ट तयार होती. ठसठशीत नाव लिहिलेल्या फाईल्स तयार होत्या. रक्ताच्या चाचण्या झाल्या होत्या आणि पेपरवर नमूद केल्या होत्या. संमती पत्र जोडले होते.

    हॉस्पिटलच्या प्रांगणात गाव गोळा झाला होता. कोणाचे काय, तर कोणाचे  काय ? पिशव्या, गाठोडी घेवून ही आदिवासी मंडळी ऑपरेशन साठी ४ दिवस राहण्याच्या हेतूने आली होती. त्यांना जाणे येणे शक्य नसते. आजूबाजूला कुठे चूल पेटवून चहाचे आधण दिसत होते, तर कुठे पोरं-बाळं बागडत होती. बाया-बापड्या, म्हातारे-कोतारे सर्व जण थंडीपासून बचाव म्हणून पागोटे गुंडाळून बसली होती.

प्लास्टिक सर्जरीच्या या कॅम्प मध्ये जन्मजात व्यंग असलेले, ओठ दुभंगलेले, हातापायाची चिकटलेली बोटे, भाजल्यामुळे आकुंचन पावलेली कातडी –स्नायू, कॅन्सरच्या गाठी असे बरेच रुग्ण होते. माझ्या नजरेतून थायरॉईड, पॅरोटीड, difficult intubation सुटले नाही.

     रिसेप्शनला असणारी सिस्टर माईक वरून प्रत्येकाचे नाव पुकारून आत बोलवीत होती. नंबर आला कि त्या रुग्णाने फाईल घेवून आत यायचे ‘प्री अनेस्थेसिया चेकअप’ साठी. एका दिवसात सकाळी ते रात्री १२ तासात १७७ प्री अनेस्थेसिया चेक अप करून झाले. प्रत्येक पेशंटशी बोलून, कानात स्टेथोस्कोप लावून लावून कान दुखत होते. माझा स्टॅमिना संपला होता.

पण ऑस्ट्रेलियावरून आलेले डॉ. दिलीप गहाणकरी, जे प्लास्टिक सर्जन आहेत, दरवर्षी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता खातर येत असतात आणि विनामूल्य उपचार करून येथील अनेकांना सुंदर–सुकर-सुसह्य आयुष्य देऊन जातात, ते आणि डॉ आशिष -डॉ कविता सातव यांचे सर्जरीच्या दृष्टीने पेशंट बघण्याचे काम सुरु होते. नंतर मला सकाळी कळले कि रात्री ३ वाजता OPD संपली आणि मग OT लिस्ट तयार झाली.

    सर्व चाचण्या करणे , ऑपरेशनची लिस्ट तयार करणे, सारं कसं नियोजन बद्ध. आधीच सर्वांचे रक्त तपासणी झाली होती. डॉ प्रशांत गहुकर याने हे सर्व फ्री करून दिले होते. २२० पैकी फक्त काही पेशंट वगळता सर्व अनेस्थेसियाच्या दृष्टीने योग्य होत्ते. आता पुढचे ३ दिवस सर्जरी करायचे होते.
    रात्री ९ ला जेवण झाल्यावर OT कॉम्प्लेक्स मध्ये तयारी काय आहे ते बघू या म्हणून गेले. सीन फारच स्फूर्तीदायक होता. निर्जंतुक केलेले ऑपरेशनचे असंख्य ड्रम, निर्जंतुक कपडे, गाऊन्स, रुग्णांसाठी कपडे, ऑपरेशन्सची अवजारे -हत्यारे, भुलीची औषधे- इंजेक्शन्स, लागणारे SUTURE MATERIALS, स्पिरीट- बिटाडीनच्या बाटल्या, असंख्य सलाईनचे खोके ...बापरे ...काय तो जामानिमा ? ही तयारी बघून मला उद्याच्या कामाचा आढावा घेता आला. त्याची व्याप्ती समजली. या सर्वात #डॉ. #कविता तहान-भूक विसरून परिपूर्ण डुबून गेली होती.
    सकाळी उठल्यावर मी तडक OT गाठले. एकदा का ऑपरेशन्सला सुरुवात  झाली ते साडेचार वाजले तरी कळले नाही. सर्जनचे हात झपाझप चालत होते. पेशंट ऑपरेशन करून बाहेर जात होते. नवीन आत येत होते. नवीन अवजारे इकडे तिकडे धावत होते. वापरलेले बाहेर पडत होते. जणू काही दहा हात प्राप्त झाल्याची उर्जा माझ्यातही आली होती. माझी नजर चौफेर फिरत होती. वेगवेगळ्या पेशंटला लावलेले मॉनिटरचे ठोके वातावरण निर्मिती करत होते. आलबेल असल्याची नादमय किणकिण कानात सामावत होती. हातातली भुलीची इंजेक्शन्स हळुवार रुग्णाच्या शिरेत जात होती. एकावेळी OT मध्ये ४ सर्जन आणि ३-४ भूलतज्ञ, डॉ कविता आणि २२-२५ लोकं काम करीत होती. कुठेही धांदल नाही. जोरात आवाज नाही. सर्जन्सची आणि भूलतज्ञाची चिडचिड नाही. रुग्ण आत येताना एकदम शांत-संयमी वाटत होते. विशेषत: लहान मुलं सुद्धा बिनधास्त होती. अगदी गुणी बाळांसारखी. आलेली परिस्थिती त्यांना हा संयम शिकवत असावी. बराच वेळ उपाशी होती तरी त्यांचाही दंगा नव्हता. 
       “मै ऑपरेशन को आउंगी पर मुझे चॉकलेट चाहिये. मी “हो” म्हणताच ती चिमुकली मुलगी नाचत बागडत हातात स्वत:ची फाइल घेवून OT मध्ये आली. चेहऱ्यावर आनंद -उत्साह ओसंडून वाहत होता. तिचे ते बेधडक, स्वच्छंदी वागणे मला आवडले. लोकल भूल देऊन ‘छोटी गाठ’ काढायची होती. टेबलवर झोपवले ...एक इंजेक्शन दिले. काही रडारड नाही ...मनात विचार आला इतकी सोशिक कशी ही मुलं ?
      दु:ख-वेदना, हार्डशिप इतकी वाटयाला आलेली असते कि त्यांना काय ते एका इंजेक्शनचे?

मी तिच्याशी गप्पा मारत मारत तिच्या आयुष्यात डोकावून बघण्याचा प्रयत्न केला. तर लक्षात आले करना हो पहचान उदास लोगोन्की .....
            तो गौर से देखो ओ मुस्कुराते बहोत है...!

    एकंदरीत प्रत्येक दिवशी रात्रीचे १२ होत असत ऑपरेशन संपायला. ३ दिवसात 133 ऑपरेशन्स करून उच्चांक गाठला. सर्व स्टाफचे कौतुक केले तितके थोडेच आहे.
     
    खरं तर हा सर्जिकल महामेळा म्हणजे एक झंझावात!

मेळघाटातल्या रुग्णासाठी ..त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी  झपाटलेल्या डॉ. आशिष, डॉ. कविता या आरोग्ययोगींचा !

एक सोहोळा ... एकत्र काम करण्याचा ...गरजूंना आरोग्य सेवा देण्याचा... खारीचा वाटा  उचलण्याचा... अमुल्य योगदानाला हात लावून त्यांचे हात बळकट करण्याचा...!

   असाच तो दरवर्षी होवो असे म्हटले तर थोडे वावगे होईल ...कारण सुदृढ समाज होवो असे वाटते....मग खुप ऑपरेशन होवो असे कसे म्हणणार? ...पण अशी वेळ आल्यास हम तुम्हारे साथ है किंवा हम साथ- साथ है म्हणायला काय हरकत आहे ?

Below is the post by Dr. Maya Bhalerao, from Pune, who participated in 2018 Plastic Surgery camp at MAHAN Melghat.

      हो...ते तर मेळघाटातील देवदूतच !!
                                                        डॉ माया भालेराव


     मनुष्य सतत आनंदाच्या शोधात असतो. त्यासाठी कधी कधी देशविदेशाची सहल करतो. डोंगरदऱ्यातून साहसी सफर करतो. मनोरंजन म्हणून नाटकं -सिनेमे बघतो. छान कपडे घालून मिरवतो. आपल्या आनंदी आयुष्याच्या सर्वसामान्य व्याख्या करतो. आपण मौजमजेतच धन्यता मानतो. पण ह्या सर्व गोष्टीपासून काही लोक वंचित आहे. ज्यांना रोजच्या पोटभर जेवणाची भ्रांत आहे. ज्यांचा रस्ता आरोग्याच्या सेवेपासून कोसभर दूर आहे, ज्यांना थंडी वाऱ्यापासून संरक्षण होईल इतके पुरेसे कपडे सुद्धा नाहीत. त्यांच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने काय करत असतो ?? मी लिहितेय...महाराष्ट्रातील दुर्गम भाग - मेळघाटातील आदिवासी लोकांबद्दल !
   
     हो, या वंचित लोकांसाठी झटणारे काही मायबाप आहेत. त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी ही थोर मंडळी म्हणजे कधी ते बाबा आमटे, डॉ प्रकाश- डॉ मंदा आमटे असतात...नाहीतर ते डॉ रवींद्र- डॉ स्मिता कोल्हे असतात... कधी ते डॉ अभय- डॉ राणी बंग असतात... आणि कधी ते डॉ आशिष- डॉ कविता सातव असतात. ही देवमाणसं कुठेही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न येता अविरत कल्याणकारी कामे करत असतात.
   
       अश्या महान लोकांपैकी एका जोडप्याला भेटण्याचं भाग्य मला लाभलं. महात्मा गांधीजींच्या आणि विनोबा भावेंच्या विचारांनी भारावलेले हे तरुण डॉक्टर म्हणजे डॉ आशिष- डॉ कविता सातव. ‘India Lives in villages’   म्हणत लग्नानंतर “महान चॅरिटेबल ट्रस्ट फॉर ट्रायबल पिपल” ची स्थापना केली. गेल्या २० वर्षापासून आशिष- कविता मेळघाटातील आदिवासी लोकंसाठी जीवाभावाने सेवा देत आहेत. रोजच्या विनामूल्य तपासणी व्यतिरिक्त अनेक आरोग्याच्या योजना ते राबवितात. अनेक कॅम्प्स घेतात. सर्जरी करतात. त्यांनी उभारलेल्या जंगलातल्या झोपडीत बनविलेल्या आयसीयू पासून तर आता अद्यावत आयसीयू आणि ऑपरेशन थियेटरचा प्रवास अतिशय कष्टदायी आहे. थरारक आहे. वाखाणण्यासारखा आहे.
 
      २१ ते २५ डिसेंबर दरम्यान त्यांनी आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरीच्या कॅम्पला जाण्याचा मला योग आला. प्लास्टिक सर्जरीच्या या कॅम्प मध्ये जन्मजात व्यंग असलेले, ओठ दुभंगलेले, हातापायाची चिकटलेली बोटे, भाजल्यामुळे आकुंचन पावलेली कातडी –स्नायू, कॅन्सरच्या गाठी असे बरेच रुग्ण होते. त्यासाठी ऑस्ट्रेलियावरून एक भला माणूस डॉ. दिलीप गवाणकरी जे प्लास्टिक सर्जन आहेत, दरवर्षी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता खातर येत असतात आणि विनामूल्य उपचार करून येथील अनेकांना सुंदर–सुकर-सुसह्य आयुष्य देवून जातात.

     आपल्या शहरी वातावरण अंगवळणी पडलेल्या शरीराच्या मनात असंख्य प्रश्न पिंगा घालू शकतात ! तेथे जेवण कसे असेल ? राहायची व्यवस्था कशी असेल ...आंघोळीला, प्यायला पाणी असेल न ? पण अपेक्षा ठेवल्या नाही तर नाराज व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तेच केले. कसेही असले तरी जुळूवुन घ्यायची माझी तयारी होती. अश्या शंका, प्रश्न बाजूला ठेवून २१ डिसेंबरला मी पुण्याहून मेळघाटात पोहचले.
   
      डॉ आशिष आणि कविता यांनी आधीच १२० पेशंट सर्जरी साठी तयार करून ठेवले होते. डॉ प्रशांत गहुकर यांनी  त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून दिल्या. इसीजी,एक्स रे सुद्धा तयार होते. तेथे पोहोचल्याबरोबर लगेचच तासाभरात फ्रेश होऊन सर्जन डॉ. दिलीप यांनी सर्जरीच्या दृष्टीने व मी भूल देण्याच्या दृष्टीने हे सर्व पेशंट सकाळी पासून तर रात्री पर्यंत बघितले. त्यानंतर ऑपरेशनची लिस्ट तयार केली. कोणाला आधी, कोणाला कसे करायचे, किती वेळ लागणार, भूल कोणत्या प्रकारची द्यावी लागणार असे सगळे नियोजन केले.
   
       डॉ दिलीप यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाहून नर्स मिस बेथेलीया आणि  फीजीओथेरपिस्ट मिस  जौडी या मोठ्या उत्साहाने आल्या होत्या. डॉ कविता ऑपरेशनसाठीची अनेक अवजारे, औषधे, इंजेक्शन्स, सलाईनच्या बाटल्या, कपडे याच्या गराड्यात बसून दुसऱ्या दिवशीच्या तयारीत मग्न होती.
   
     एकावेळी ५ ऑपरेशन टेबल वर ऑपरेशन सुरु करायचे होते. मी सकाळी लवकर जाऊन ओटी मध्ये तयारी केली. भुलीची औषधे, यंत्रणा सज्ज ठेवली. जेणेकरून रुग्णांना एकापाठोपाठ सर्जरीसाठी घेता येईल. बाहेर ६.४ अंश  कडाक्याच्या थंडीत ऑपरेशन करून घेण्यासाठी गाव जमा झाला होता. सकाळीच रुग्ण उपाशीपोटी रांगा लावून तयार होते .
       
       सर्व तयारी झाल्यावर ९ वाजता पहिला पेशंट आत घेतला. टीम चे नाव नमूद करायलाच हवे. डॉ आशिष आणि सहकारी ओटी बाहेरील व्यवस्था सांभाळत होते. ऑपरेशन थियेटरमध्ये डॉ कविता अतिशय शिस्तबद्ध रितीने  पेशंट ची ने-आण करणे, सिस्टर, वॉर्ड बॉयला सूचना देणे, आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देणे, जमल्यास छोटी ऑपरेशन करणे असा मल्टीपर्पज रोल लीलया करत होती.
    
         माझ्यासह अजून काही भूलतज्ञ डॉ अंजली कोल्हे, डॉ सचिन पावस्कर, डॉ शरयू मुळे आणि ऑस्ट्रेलिया वरून आलेले भूलतज्ञ डॉ हेल्गे, आम्ही भूल देण्याची जबाबदारी सांभाळत होतो. सर्जरीसाठी प्लास्टिक सर्जन डॉ. टावरी, डॉ मेहता, डॉ रवी अशी सर्जन मंडळी तैनात होती. अनेक सिस्टर- वॉर्ड बॉय आपापली कामे चपळाईने करत होते. एकंदरीत सर्व माहोल उर्जा आणि उत्साहाने झपाटल्यागत झाला होता. पहिल्या दिवशी सकाळी जो सर्जरी करण्याचा सपाटा सुरु झाला तो रात्री १०.३० वाजता ५६ ऑपरेशन करून आम्ही बाहेर पडलो. त्यात जेवण आणि दोन वेळेचा चहा सोडला तर मध्ये ब्रेक नव्हता!
        
        दुसरा दिवस सुद्धा तसाच ! १००-१२० सर्जरी प्लान केल्या होत्या. ऑपरेशन थियेटर मध्ये कामात टीम वर्क आणि नियोजन असल्याने सर्जरी करायला वेग होता. अद्ययावत अवजारे –निर्जंतुकीकरण करण्याची सामग्री- असल्याने योग्य- न्याय सुविधा देता येत होत्या. ३-४ भूलतज्ञ असल्याने रुग्णाची सुरक्षितता ध्यानात होती. कुठेही गडबड- गोंधळ -हलगर्जी पणा नव्हता.
    विशेष म्हणजे डॉ आशिष आणि कविता यांचे झंझावातासारखे काम आणि आदिवासी रुग्णांचा यांच्या दोघांवरचा विश्वास सगळं कसं आनंद देणारं होतं. मनस्वी समाधान देणारा डोंगर मी हळूहळू चढत होते.
     तिसऱ्या दिवशी माझी परत निघायची वेळ आली. डॉ सातव यांच्या सहकाऱ्याने मला जाता जाता राहण्याच्या खाण्यापिण्याच्या सोयी कश्या होत्या याबाबत फीड बॅक फॉर्म भरायला दिला.

मी काय लिहिणार त्यावर ? सुविधा एवरेज कि गुड? कि व्हेरी गुड किंवा नॉट गुड ? माझे हात अडकले. अरे काय हे ? त्या तर इतक्या एक्सलंट होत्या कि ज्याला कागदावरच्या कॉलमच्या साच्यात बसविणे म्हणजे त्या सन्माननीय जोडप्याच्या कामाचा अपमान होता. इतक्या दुर्गम भागात सोयी सुविधांना कॅटेगरीची खरंच गरजच नाही . माझ्या दृष्टीने त्या अति उच्च दर्जाच्या  होत्या.

   सकाळ संध्याकाळ गरमागरम, चविष्ट नास्ता, जेवण...राहण्याची आणि आंघोळीची सोय आणि या ही पेक्षा त्यांचे आदरतिथ्य, आतिथ्यशीलपणा आणि साधेपणा हा खूप खूप जास्त अनमोल होता.

    माझे तर सोडाच ! ज्या सुविधा, आरोग्यसेवा ही दोघे गेली कित्येक वर्षे आदिवासींना विनामूल्य देत आहेत तिथे माझ्या दोन दिवसाच्या सुविधेचे काय ? मी तर कोणत्याच अपेक्षेने गेले नव्हते. गेले होते अल्पसे योगदान द्यायला पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त आनंद घेवून बाहेर पडत होते. कारण त्या दोघांचा ऑटोग्राफ माझ्या मनःपटलावर नकळत उमटला होता.

 निस्वार्थ पणे आपले आयुष्य दुलर्क्षित असलेल्या घटकांसाठी झोकून द्यायला, जंगलात जाउन डॉक्टरी करणारे  आशिष- कविता हे महान आरोग्यदूत आहेत. मी तर म्हणेन वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडायला पृथ्वीतलावर आलेले ते तर देवदूतच !

bottom of page